रविवार, १९ एप्रिल, २०२०

भुमि अभिलेख विभागातील अभिलेखांचे प्रकार - भूमापन



भुमि अभिलेख विभागातील अभिलेखांचे प्रकार  - 
भूमापन 

➤टिपण 


टिपण  म्हणजे संबंधित जमिनीचा एक प्रकारे अपरिमाणात काढलेला नकाशाच असतो. प्रथम जेंव्हा शेतजमिनीची मोजणी शंकुसाखळीने करण्यात आली, तेंव्हा संबंधित जमिनीचे नकाशे तयार करणेत आले. व त्याला सर्व्हे नंबर देण्यात आले. प्रत्येक स.नं. चे नकाशे व क्षेत्र तयार करुन ठेवण्यात आले. त्यालाच भूमापनाचे मूळ अभिलेख किंवा टिपण असे म्हणतात. टिपण हे मोडी लिपीत आहे. तसेच मराठवाडयात हे काही भागात उर्दूमध्ये आहे कारण त्या ठिकाणी निजामशाही होती. टिपणामध्ये सर्व्हे नंबरची बाहय बाजू भरीव रेषेमध्ये व त्यावरील लंब तुटक रेषांनी दर्शविलेले असतात. त्यावर मोजणी केलेल्या साखळीची मापे लिहीलेली असतात. लंबामुळे तयार झालेल्या भागांना वसला (त्रिकोण/ समलंब चौकन)म्हणतात व त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात . या टिपणामध्ये संबंधित सर्व्हेनंबरचे लगत भूमापन क्रमांक व जागेवरील स्थिती (गावठाण रस्ते,पाऊल रस्ते, बैलगाडी रस्ता , ओढा, ओघळी , विहीर, झाडे इ.) बाबी नमुद केलेल्या असतात.या सर्वबाबींमुळे जमिनीच्या भूमापन क्रमांकाचे क्षेत्रफळ अचुक काढता येते. त्यामुळे सध्या केलेल्या मोजणीकामाची तपासणी/खात्री भूमापक टिपणा आधारे करतो.धारण केलेल्या प्रत्येक जमिनीचे (सर्व्हे नंबरचे) त्या जमिनीच्यआकारमानाप्रमाणे परिमाणात न काढलेली, आधार रेषा आणि लंब यांचे शंकुसाखळी नुसार रुपये/ आणे या परिमाणात निश्चित मोजमापे बांधमापे, वसलाक्रमांक, हद्दीच्या खुणा व लगतचे सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात अशा पध्दतीची जमिनीच्या आकारमानाप्रमाणे परिमाणात न तयार केलेल्या अभिलेख म्हणजे टिपण होय.

    अ) कच्चे टिपण :
प्रत्येक भूमापन क्रमांकाचे धारण केलेल्या वहिवाटी नुसार कच्चेटिपण (परिमाणात नसलेले रेखाचित्र) तयार करण्यात येते.त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाण्या घेऊन शंकू साखळीचे आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शविली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमानुसार चालता नंबर देण्यात येतो.लगत भूमापन क्रमांक लिहिले जातात.टिपण आकृतीचे मोजमापानुसार वसलेवार पध्दतीने भूमापन क्रमांकाचे क्षेत्र कायम करण्यात येऊन त्यावर एकूण क्षेत्र,बागायत क्षेत्र,तरी/गद्दी याचा उल्लेख असतो.
    ब) पक्के टिपण :
यामध्ये प्रत्येक भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्र असते.त्यावर बांधमापे दर्शवून चालता नंबर,अंतिम नंबर,शेताचे नाव व सत्ता प्रकार इत्यादी बाबी नमुद केलेल्या असतात.

➤शेतवार पुस्तक-
सदर पुस्तकात भूमापन क्रमांकानुसार क्षेत्र व आकार नमूद केलेला असतो.
➤कच्चा सुड-
कोकण विभागात एकूण क्षेत्र दाखविण्याकामी सुड वापरला जातो. त्यामध्ये भूमापन क्रमांक,पोटनंबर, स्थळाचे नाव, जिरायत, बागायत यांचे क्षेत्र व आकार नमूद असतो.
                                                                                     
➤पक्का सुड-

यामध्ये भूमापन क्रमांक व त्यामध्ये पडलेल्या पोटहिस्स्याची स्केली आकृती असते.तसेच जमिनीचा प्रकार,भूमापन क्रमांक व पोट हिस्स्याचे असणारे खराबा क्षेत्र व आकार नमूद असतो.सदरचा पक्का सुड हा डोंगराळ भागातील गावासाठी ठेवण्यात येतो.





दरवारी
दरवारी मध्ये भूमापन क्रमांक,प्रत नंबर,कच्चा व पक्का आकार व क्षेत्र नमूद असते.
क्लासर रजिस्टर
यामध्ये भूमापन क्रमांक / पोटनंबर जमिनीचे प्रकारवार क्षेत्र,पोटखराब, जिरायत, बागायत व तरी याप्रमाणे दर व आकार नमूद केलेला असतो. तसेच गावापासून व पाण्यापासून असणारी लांबी, मैल वरुन कायम एकरी दर काढलेला असतो.

प्रतिबुक

जमाबंदी करतेवेळी प्रतबंदी करताना प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्याप्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते.प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुन, त्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भागआणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुन, आकार बसविण्याचे काम केले जाते.त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवही मध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांक, मोजणी नंबर, डागाचे नाव, कर्दाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्र, खराबा क्षेत्र, व लागवडी लायक क्षेत्र, इत्यादी नोंदी घेतल्या जातात.





क्षेत्रबुक
भूमापन क्रमांकाचे मोजणीअंती परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक म्हणजे क्षेत्रबुक होय.यामध्ये धारकाचे नांव, सर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्र, चालता नंबर, इ. बाबी नमुद असतात.
वसलेवार बुक
भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठी, भूमापन क्रमांकाचे काटकोन, त्रिकोण व समलंब चौकोन यात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार होय.
मोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुन, निश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवून, गणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असते, त्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.
बागायत तक्ता -
वर्गकार, बागायत स.नं. करीता तक्ता तयार करतात. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती त्यांनी प्राप्त करुन घेतली, ती सर्व हयात सुध्दा नमुद केली जाते. विहीरीची नोंद, स.नं. चे हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक स.नं. ची नोंद ठेवतात. त्या स.नं.चे गांवापासूनचे अंतरही नोंदवतात. गांवनकाशा व गांव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाव, वोडी,कुंटा या पासुन पाणी शेतीला मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.


आकार बंद -
गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायत, बागायत,तरी(भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे(गाव नमुना नंबर 1) आकारबंद केला जातो.
एखादया गावाचे एकूण क्षेत्र,भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक,त्यांचे प्रत्येकी क्षेत्र,आकार, लागवडीचे क्षेत्र, पोटखराबा, सत्ताप्रकार, प्रतवारी, जमिन महसूल आकारणी,जमाबंदीची मुदत,तसेच एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहे, त्याचा तपशील दर्शविणारा गाव नमुना नं.1 म्हणजे आकारबंद होय. आकारबंदा मध्ये गावचे एकुण क्षेत्र, लागणी लायक, खराबा त्याचा आकार या नोंदी संधारण केलेल्या आहेत.
आकार बंदाचे शेवटचे पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज ही जमिनीचे वेगवेगळया प्रकारात दर्शविलेली असते. तसेच नाकीर्दसार म्हणून एक सदर असते, त्यात गावठाण, नदया,नाले, शिवेवरील भाग, ओढा, रस्ते, कॅनॉल,तलाव, रेल्वे, इ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास जुमला बेरीज असे म्हणतात.


गांवचे नकाशे

गाव नकाशा हा भूमापन अभिलेख आहे. कारण तो गावचे सर्व भूक्रमांक दर्शवितो.गाव नकाशा 1 इंच = 20 साखळी किंवा 10 साखळी या परिमाणात काढलेला आहे.आता दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गावनकाशे 1:5000 व 1:10000 या परिमाणात तयार केले जातात.गावाचा नकाशा मध्ये गावातील गावठांण, झाडे,विहिरी,डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी , गाडी रस्ते, पांधण रस्ते, पक्के रस्ते,झुरी इ. बाबी नमुद असतात.गावच्या नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सिमा समजून येतात.

क्रमशः